ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येथील श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली . येथील जानोरी रोडवरील शंभर एकर जागेत पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतीत आयोजक ओझर यात्रा कमेटीच्या वतीने रोख पावणे तीन लाख रूपयांचे बक्षिसांसह तीन सायकली बक्षिस म्हणून वाटप करण्यात आल्या.
या स्पर्धेत तीनशेच्यावर स्पर्धेकांनी सहभाग घेतला दुपारी दोनच्या सुमारास यात्रा कमेटीचे अध्यक्ष परशराम शेलार, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, कार्याध्यक्ष रामु पाटील,प्रशांत पगार, धनंजय पगार, कामेश शिंदे, उमेश देशमुख, संजय भडके, शिवा शेजवळ, किशोर त्रिभुवन, राकेश जाधव, अविनाश आंबेकर, शरद वाबळे, सचिन शिवले, दत्तु घोलप, अशोक शेलार आदिंच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ झाला.
या स्पर्धेत जिल्हाभरातील बैलगाडा शौकिनांनी आपला सहभाग घेतला. अंतिम फेरीत मौजे सुकेना व त्र्यंबकेश्वर येथील बैलगाडा शर्यत झाली यात मौजे सुकेणा येथील मोगल यांच्या बैलांनी बाजी मारली. दुसऱ्या नंबरची शर्यत चेहडी आणि आडगाव यांच्यात होत यात चेहडीच्या बैलगाड्याची सरशी झाली. तिसरी फेरी मखमलाबादची बैलगाड्याने बाजी मारत कुरडगावच्या बैलगाड्यास अस्मान दाखवले. या शर्यतीत जिल्हाभरातील निफाड, मौजे सुकेणा, दिक्षी, नांदुरशिंगोटे, सिन्नर, लखमापुर, दिंडोरी, देवळा, सटाणा, धारणगाव, जोपुळ, मोहाडी, टाकळी विंचुर आदि गावातील बैलगाडा शौकींनांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेस नागरीकांनी मोठी गर्दी केली होती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.