नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या तरुणीला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणा-या मुंबईच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या या तरुणाने शहरातील युवतीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याने अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नावेद अन्सारी (२३ रा. मालवणी चर्च जवळ मालाड,मुंबई ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात प्रेमसंबध आहेत. सन.२०२१ मध्ये संशयिताने पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने शहरात येवून पीडितेस मुंबईनाका येथील संदिप हॉटेलसह विविध भागातील लॉजवर घेवून जात बलात्कार केला.
यावेळी संशयिताने दोघांचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढले. तरूणीने आता लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की करीत आहेत.