नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूररोड भागात सदनिकेत इंटेरियरचे काम करीत असतांना दुस-या मजल्यावरून पडल्याने २७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. राहूल तुपे (२७ रा.एकलहरा,ना.रोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुपे गुरूवारी (दि.२१) सतिष आहिरराव या ठेकेदाराच्या माध्यमातून ऋषीराज हार्मोनियम या इमारतीतील सदनिकेत इंटेरियरचे काम करण्यासाठी गेला असता ही घटना घडली. या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील घराचे काम गॅलरीत उभा राहून करीत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला.
या घटनेत गंभीर जखमी झाल्याने सोसायटीतील सुमित राठोड यांनी त्यास तात्काळ श्री गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. प्रेमलता चारोळे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत ज्योती सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सहाणे करीत आहेत.