नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत माहिती दिली की, आपल्या विमान ताफ्यात अतिशय वेगाने वाढ होत आहे. २०१४ मध्ये केवळ ४०० विमाने असलेल्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आज जवळपास ६४४ विमाने आहेत.
“शेड्युल्ड व्यावसायिक विमान कंपन्यांच्या दृष्टिकोनातून जमिनीवर असलेल्या म्हणजेच काही कारणाने सध्या उड्डाण केले जात नसलेल्या विमानांची संख्या अंदाजे १४० आहे. इंजिन पुरवठादार प्रॅट आणि व्हिटनी यांना पुरवठा साखळीतील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही प्रॅट आणि व्हिटनी यांच्या थेट संपर्कात आहोत आणि ही परिस्थिती अस्वीकार्य असल्याचे त्यांना कळवले आहे, कारण भारतातील विमान वाहतुकीत वेगाने वाढ होत आहे” असे त्यांनी सांगितले.
आपला ताफा सतत विस्तारत असून गेल्या वर्षी ६२६ असलेली विमान संख्या आता ६४४ वर पोहोचली आहे. मार्च २०२४ पर्यंत, दरमहा सुमारे २ ते ५ विमानांचा ताफ्यात समावेश केल्यानंतर ही संख्या ६८६ पर्यंत वाढेल, अशी माहिती शिंदे यांनी सभागृहाला दिली.