नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी खासदार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या नाशिक येथील घराजवळून कामधेनु बंगला डिसूजा कॉलनी, जेहान सर्कल सर्कल जवळ, गंगापूर रोड येथून दुपारी तीन वाजता निघेल. वर्षभरापूर्वी त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्देबद्दल त्यांचा जीवन गौरवाने सन्मान करण्यात आला होता. ते धुळे लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली
अशुभ बातमी आली आणि मविप्र मधील प्रत्येकाला दुःखाच्या खाईत लोटून गेली. मविप्र संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार, हाडाचे इंजिनियर, शिक्षणतज्ज्ञ, अजातशत्रू नेते आदरणीय प्रतापदादा सोनवणे यांचे दुःखद निधन झाले. शिक्षणाच्या क्षेत्रातील तळमळीचा कार्यकर्ता गेला. मविप्रचा मार्गदर्शक हरपला. मविप्रमधील परिवर्तनाचा शिल्पकार गेला. गोरगरिबांच्या संवेदना जाणणारा लोकप्रतिनिधी गेला… विश्वास ठेवणे कठीण आहे… आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली.
मंत्री छगन भुजबळांकडून श्रध्दांजली!
धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते प्रतापदादा सोनवणे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!