नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन झाले. हे संग्रहालय स्वतंत्र भारताच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानाचा गौरव करणारे आहे. तसेच प्रत्येक वर्गातील आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातील नेत्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देण्यासाठी आपल्या लोकशाहीने कशा प्रकारे संधी उपलब्ध करून दिल्या आहेत याचे देखील दर्शन घडवते. या नव्या डिजिटल वस्तुसंग्रहालयाचा विस्तार दोन इमारतींमध्ये झालेला आहे. इमारत क्रमांक १ मध्ये जुन्या तीन मूर्ती भवनमधील, जवाहरलाल नेहरू यांचे दालन, संविधान दालने, तोषखाना आणि जवाहरलाल नेहरू यांची व्यक्तिगत विंग याचा समावेश होतो. इमारत क्रमांक २ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्यापासून डॉ.मनमोहन सिंग यांच्यापर्यंत पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या सर्वांचे व्यक्तिगत जीवन तसेच त्याच्या काळातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांचे दर्शन घडते. या सर्वांनी भारताच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात दिलेल्या योगदानांची माहिती प्रत्येक दालनात मिळते.
पंतप्रधान संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना गुंगवून टाकणारा म्हणजे ‘अनुभूती’ हा विभाग उभारण्यात आला आहे. या विभागाला भेट देणाऱ्यांना ‘पंतप्रधानांसोबत सेल्फी’, ‘पंतप्रधानांसोबत फेरफटका’, ‘पंतप्रधानांकडून पत्र’ असे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, देशातील वास्तुरचना आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील अत्युत्कृष्ट नमुन्यांचे दर्शन घडवणारी आभासी हेलिकॉप्टर सफर देखील याठिकाणी उपलब्ध आहे.
या विभागात दर्शकांना कोणत्या पंतप्रधानांशी संवाद साधायचा आहे त्यांची निवड करता येते. व्हिजन २०४७ अभिप्राय भिंतीवर लोक एखादा प्रेरणादायक संदेश लिहू शकतात तसेच एका मोठ्या भिंतीवर गटाने ‘एकता साखळी’मध्ये त्यांची उपस्थिती नोंदवू शकतात. या संग्रहालयातील दालनांमध्ये आलेले लोक, मार्गदर्शक/ श्राव्य मार्गदर्शक, उपाहारगृह तसेच स्मरणिक दुकान यांच्या दरम्यानच्या सुलभ प्रवासासाठी येथे गोल्फ कार्ट्स तसेच व्हील चेयर्स देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.