नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात ,सांगली व केडन्सने निर्णायक विजय मिळवले तर नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.
महात्मानगर क्रिकेट मैदानावर ॲमबिशिअसने पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत नाशिक विरुद्ध पहिल्या डावात १७३ धावा केल्या. आर्यन चौहानने ५४ धावा केल्या. नाशिकच्या आर्यन घोडके व नील चंद्रात्रेने प्रत्येकी ४ बळी घेतले. उत्तरादाखल नाशिकने नील चंद्रात्रेचे नाबाद शतक व आर्यन घोडकेच्या ८१ धावांच्या जोरावर ४ बाद २४३ वर डाव घोषित केला. नैतिक घाटेने नाबाद ३२ धावा केल्या. ॲमबिशिअसने दुसऱ्या डावात १ बाद १३९ धावा केल्यावर सामना अनिर्णित अवस्थेत संपला. नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.
दुसऱ्या सामन्यात एसएसके क्रिकेट मैदानावर सांगलीने दीप जाधवच्या दीप जाधवच्या पहिल्या डावातील ५ बळी, शतक व दुसऱ्या डावात ४ बळी या अष्टपैलु कामगिरी च्या जोरावर उस्मानाबादवर एक डाव व ११० धावांनी मोठा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात एमसीसी क्रिकेट मैदानावर केडन्सने प्रतिक कडलगच्या ८३ धावा व तीन बळी तसेच प्रसाद आंबलेचे सामन्यातील एकूण ७ बळींच्या जोरावर सी एन ए वर एक डाव व २४ धावांनी मोठा विजय मिळवला.