नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून तीन जणांच्या टोळक्याने तरूणावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या खिशातील रोकड लंपास केली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल गोरे,जना काकड व शुभम नामक तरूण अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत मोहम्मद आदाब हुसेन जाफरी (२६ रा.लामखेडे मळा,बेकरीसमोर पंचवटी) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. जाफरी मंगळवारी (दि.१९) रात्री नेहमी प्रमाणे दिंडोरीरोडवरील पंचवटी भाजीपाला मार्केट यार्डात गेला होता. संशयितांनी त्यास गाठून पैश्यांची मागणी केली.
मात्र त्याने पैसे देण्यात नकार दिल्याने टोळक्याने त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत बेदम मारहाण केली. यावेळी एकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. याघटनेत जाफरी जखमी होताच संशयितांनी त्याच्या खिशातील चार हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.