इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्र सरकार मार्च अखेर जीपीएस पद्धतीने टोल आकारणी करणार आहे. त्यामुळे जितका रस्ता वापरला, तेवढाच कर भरावा लागेल. तसेच वाहनधारकाच्या खात्यातून तो आपोआप वजा होणार असल्याने टोलनाक्यावरचा वेळ वाचणार आहे. केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारने सध्याच्या टोल वसुली पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार मार्चपर्यंत जीपीएस-आधारित टोलवसुली पद्धत नवीन तंत्रज्ञानासह आणणार आहे. देशातील टोल व्यवस्थेतज आमुलाग्र बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्या यंत्रणेमुळे वाहनधारकांना टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. रांगांच्या जाचातून त्यांची सुटका होईल. स्वयंचलित टोल वसुलीसाठी ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सिस्टम’चे दोन पायलट प्रोजेक्ट सुरू केले आहेत.
टोलनाक्यांवर वाहनांना सरासरी आठ मिनिटे थांबावे लागत होते. फास्टॅग प्रणाली लागू केल्यानंतर ही वेळ फक्त ४७ सेकंदांवर आली. दाट लोकवस्तीच्या शहरांजवळील टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी झाली असली, तरी काही ठिकाणी अजूनही फार वेळ जातो. गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा लागतात. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वीच नवी प्रणाली लागू करण्याचा केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहे.