इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची एकही संधी सत्ताधारी गट सोडत नाही. त्यामुळे आता कोरोना काळात झालेल्या पुन्हा एका कथित गैरव्यवहाराची मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशील पारेख यांचाही समावेश आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या खरेदीत त्यांची चौकशी केली जात असल्याने ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोरोना काळातील ५.९६ कोटी रूपयांच्या रेमडेसिव्हिर खरेदी प्रकरणात पारेख यांची चौकशी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सरकार ठाकरे परिवाराला घेरत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पारेख यांची तब्बल सात तास चौकशी केली. त्या वेळी त्यांना त्यांना रेमडेसिव्हिर खरेदीबाबत प्रश्न विचारण्यात आले. कोरोना काळात ठाकरे यांच्या सामाजिक कार्याच्या टीममध्ये पारेख यांचा सहभाग असल्याची माहिती हाती आली आहे. मायलॅन कंपनीच्या ठेक्याची महापौर बंगल्यावर चर्चा होत असताना पारेख तिथे उपस्थित होते.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी जादा दराने झाल्याचा आरोप आहे. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याची काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या जबाबाच्या आधारे रेमडेसिव्हीर कंत्राटाबाबत पारेख यांची चौकशी करण्यात आली.