मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष कुठे असेल हे अद्याप जवळपास ठरले असले तरी निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाच्या वेळी नेमकं काय घडतं हे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे तूर्त महायुती व महाविकास आघाडी यांची समोरासमोर लढत होणार असल्याचे चित्र आहे. पण, याचवेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली असून त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.
त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले आहे की, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.
जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली माहितीवर अद्याप कोणत्याही राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. भाजपने एकट्याने स्वतंत्र लढवण्याचा निर्णय़ घेतला तर शिंदे गट व अजित पवार गटाच्या अडचणी वाढणार आहे. पण, हे दोन गट वेगेळे लढले तर भाजपलाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे अशी शक्यता कमी असली तरी राजकीय चर्चा मात्र रंगली आहे.