दीपक ओढेकर, नाशिक
काल हॅंगझाउ येथील १९ व्या आशियाई स्पर्धेच्या १२ व्या दिवशी नाशिकच्या खेळाडूना वैयक्तिक पदक जिंकण्याची शेवटची संधी होती पण दुर्दैवाने तीत खेळाडूना अपयश आले. सिध्दार्थ परदेशी १०मी प्लॅटफॉर्म डायव्हिंग मध्ये उपांत्य किंवा पात्रताफेरीतi २५७ :७५ गुण मिळवून अंतिम फेरीत पोहोचला पण तेथेही तो २६८ गुण मिळवून ११वाच आला. विजेत्या चीन च्या हावो यांगचे गुण होते ५५४:३५.
त्यानंतर ज्याने दोन महिन्यापूर्वीच आशियाई चॅम्पियनशिप्समध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि ज्याच्यावर सर्व नाशिककरांच्या नजरा होत्या आणि कांस्य तरी मिळवेल असे वाटले होते त्या सर्वेश कुशारेने निराशा केली. त्याचे उंच उडीतील पदक तो चवथा आल्याने थोडक्यात हुकले. कांस्यपदका साठी आवश्यक असलेली २:२९ मी उडी तो काही तीन प्रयत्नात मारु शकला नाही आणि त्याला २:२६ मी उडीवरच समाधान मानावे लागले.
विजेत्या कतारच्या बशीर मोहताझ या हाय जंपरने २:३५ मी इतकी उंच, तर उपविजेता कोरियाचा वू संघ्योक ने २;३२ मी आणि कांस्यपदक विजेत्या जपानच्या शिनो टोमॅहिरो ने २:२९मी उडी मारली. यापूर्वी मागील सप्ताहात बुद्धिबळपटू विदित गुजराथी पाचवा आल्याने त्याचे पदक हुकले आणि मृण्मयी साळगावकर रोइंगमधील तिने भाग घेतलेल्या दोन्ही प्रकारात अंतिम फेरीत पोहोचूनही सहावी आणि पाचवी आल्याने तिचेही पदक हुकले.
आता काय ?
नाशिकच्या दोन खेळाडू (विदित गुजराथी आणि आकाश शिंदे) आणि एक प्रशिक्षक (शैलजा जैन) आता सांघिक पदक मिळवून देउ शकतील, किंबहुना ती शक्यता आहेच .. भारतीय बुद्धिबळ संघ आठ पैकी सहा सामन्यांनतर दुसऱ्या स्थानी आहे (पहिल्या स्थानी इराण) आणि त्यामुळे पदकाची उत्तम संधी विदितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उपलब्ध झाली आहे. तसेच पुरुषांच्या कबड्डी संघाचेही पदक निश्चित झाले आहे. त्यामुळे आकाश शिंदे पदक मानकरी ठरल्यात जमा आहे.
महिला कबड्डीत इराणने धडाक्यात सुरुवात करुन पहिले तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे. सहाजिकच शैलजा जैन यांच्या इराण संघाला अगदी सुवर्णपदक नाहीतरी रौप्यपदक किंवा कांस्यपदक मिळेल असे म्हणायला हरकत नाही. अशा रितीने तीन सांघिक पदके नाशिकच्या पदरी पडल्यात जमा आहे. तरीही सात आणि आठ तारखेपर्यंत म्हणजेच सर्व निकाल हाती येइपर्यंत थांबणे योग्य होइल., कारण खेळात काहीही होऊ शकते ! क्रिकेटमधील प्रसिद्ध वाक्य आहे. No match is over until the last ball is bowled !