नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले. विदर्भातील २९ सिंचन प्रकल्पांना निधी मिळाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर गेल्या ३३ वर्षात घडले नाही असे यंदाचे अधिवेशन असल्याचे म्हटले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन बुधवारी संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या हिवाळी अधिवेशनात एकंदरीत 14 दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या सोडून दहा दिवसांमध्ये कामकाज झाले. अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 12 मंजूर झाली. लोकायुक्त हे महत्त्वाचे विधेयक मंजूर झाले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. परंतु, तब्बल वर्षभरानंतर ते विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर झाला. तसेच महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, चिटफंड सुधारणा, महाराष्ट्र कॅसिनो निरसन करणे अशी काही विधेयके देखील मंजूर झाली. एकही मिनिट वाया न घालवता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झाले. विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यातआले.
विदर्भातील 29 सिंचन प्रकल्पांना निधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाही नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी भरीव मदत केली आहे. धानाचा बोनस जाहीर केला आहे. विदर्भातील २९ प्रकल्पांना प्राधान्य देत निधी देण्यात आला आहे. तसेच विविध गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये ६ हजार कोटी विदर्भातील प्रकल्पांना देण्यात आले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाला १५०० कोटी रुपये निधी दिला आहे. सरकारने विदर्भाचा प्रस्ताव मांडला, या प्रस्तावावर चर्चेदरम्यान समर्पक उत्तरे देत विदर्भाच्या विकासाचा आराखडा मांडला. सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. मराठा, धनगर समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनात एकही तास वाया नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, गेल्या ३३ वर्षात घडले नाही असे यंदाचे अधिवेशन झाले. हिवाळी अधिवेशनात कामकाजाचा एकही तास वाया गेला नाही. अधिवेशन काळात सुमारे १०१ तास म्हणजेच ५ आठवड्यांचे कामकाज झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. दुधाला ५ रुपये प्रतीलिटर अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, धानाला १५ हजार ऐवजी २० हजार रुपये बोनस देणे असे निर्णय घेण्यात आले. ४३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना देण्यात आले. अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेला एकही मुद्दा चर्चेविना राहिला नाही. मराठा समाजातील गरीबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.