इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः इंडिया आघाडीची बैठकीत विविध विषय़ांवर चर्चा झाली असली तरी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कोण उमेदवार असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले. या आघाडीच्या बैठकीत दोन नावांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यात प्रियंका गांधी आणि नितीश कुमार यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार वाराणसीतून निवडणूक लढवतील असा अंदाज अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. पण, ते बिहार सोडून उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवेल का हा प्रश्न आहे.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, मी ‘इंडिया’ आघाडीला खुले आव्हान देतो. कोणत्याही पक्षाच्या नेत्याने वाराणसीत जाऊन मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, मग तुम्हाला कळेल की ते काय आहेत. वाराणसीमध्ये १९९१ पासून भाजपचा खासदार निवडून येतो; मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तिथे पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२०१४ आणि २०१९ मध्ये मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळा प्रचंड मतांनी विजय नोंदवला. २०१९ मध्ये प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती; पण काँग्रेसने अजय राय यांना मोदी यांच्याविरोधात उभे केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळाली, तर समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांना १ लाख ९५ हजार १५९ आणि काँग्रेसच्या अजय राय यांना १ लाख ५२ हजार ५४८ मते मिळाली. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांना ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बनवले जाण्याची शक्यता आहे.
वाराणसी लोकसभा निवडणुकीत कोण जिंकेल कोणाचा विजय होईल हे महत्त्वाचे नाही. तर या निवडणुकीत तगडा उमेदवार उभा केला तर सर्व लक्ष या निवडणुकीकडे लागेल यामुळे हा मतदार संघ महत्त्वाचा आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने त्या पध्दतीने आपली रणनिती आखली आहे.