इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बँकेवर दरोडा पडला तर सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थिती केला जातो. पण, बँकेतच मॅनेजर जर पैसे लंपास करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न पडतो. असाच काहीसा प्रकार दिल्लीतील नोएडा येथे घडला आहे. येथील साऊथ इंडियन बँकेच्या अस्टिटंट मॅनेजरने आपल्या पत्नी व आईच्या नावावर चक्क २८ कोटीची रक्कम ट्रान्सफर करुन कुटुंबियांना घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या अफरातफरी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असिस्टंट मॅनेजर राहुल शर्मा, पत्नी भूमिका शर्मा, आई सीमा शर्मा याच्याविरुध्द ही कारवाई केली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. असोसिएट इलेक्ट्रॅानिक्स रिसर्ज फाऊंडेशन नावाच्या कंपनीच्या खात्यातून ही रक्कम काढली गेल्याचे समोर आले आहे.
या बँकेच्या विभागीय कार्यालयात तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी आपली टीम चौकशीसाठी पाठवली त्यानंतर हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे ज्या कंपनीच्या खात्यातून ही रक्कम गेली. त्यांनी तीन वेळा मेल पाठवून तक्रार केल्याचेही समोर आले आहे. इतकी मोठी रक्कम खातेदारांच्या खात्यातून लंपास केल्यामुळे इतर खातेदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.