नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दल (ICG) साठी सहा अद्ययावत ‘ऑफशोअर’ गस्त बोटींच्या (NGOPVS) च्या खरेदीसाठी २० डिसेंबर रोजी मुंबई येथील माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), या कंपनीसोबतच्या करारावर स्वाक्षरी केली. हा करार खरेदी (भारतीय-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत एकूण १६१४.८९ कोटी रुपये किमतीचा आहे. खरेदी केल्या
जाणा-या सहा जहाजांपैकी, चार सध्याच्या जुन्या झालेल्या गस्त बोटींची जागा घेतील आणि इतर दोन बोटी वाढीव स्वरूपात भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) ताफ्यात सामील केल्या जातील. उच्च-तंत्रज्ञानावर आधारित अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि उपकरणांनी सज्ज असलेल्या या ११५m गस्त बोटी बहुउद्देशीय ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता आणि वायरलेस नियंत्रित रिमोट, वॉटर रेस्क्यू क्राफ्ट लाइफबॉय इत्यादींनी देखील सुसज्ज असतील. बोटींच्या या वैशिष्ट्यांमुळे भारतीय तटरक्षक दलाला नवीन युगाच्या बहुआयामी आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक लवचिकता आणि अत्याधुनिक कार्यान्वयन प्रणाली प्राप्त होईल.
एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडू शकणाऱ्या अत्याधुनिक बोटी मुंबईतील माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेड द्वारे स्वदेशात आरेखीत, विकसित आणि उत्पादित केल्या जातील. सुमारे ६६ महिन्यांच्या कालावधीत त्यांचे वितरण केले जाईल. देशाच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेला चालना देण्यासाठी, सागरी आर्थिक क्रियांना चालना देण्यासाठी आणि सहायक उद्योगांच्या, विशेषत: सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठीच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाची उद्दिष्टे या कराराने साध्य केली आहेत. या प्रकल्पामुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि कौशल्य विकास देखील होईल.