नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदयावर लादलेली निर्यातबंदी मागे घ्यावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी आज वाणिज्य विभागाचे सेक्रेटरी रोहित सिंग यांची दिल्लीत भेट घेतली.सध्या लाल कांद्याचा हंगाम असून हा कांदा अवघ्या आठच दिवस टिकत असतो.कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने मागे घेण्यात यावी अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी वाणिज्य विभागाकडे केली आहे. आठवडयाभरात काही अटी, शर्ती घालून कांदयावरील निर्यातबंदी मागे घेण्यासाठी विचार करू असे आश्वासन सेक्रेटरी रोहित सिंग यांनी खा. गोडसे यांना दिले आहे.
सात डिसेंबर पासून केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली आहे. केंद्र शासनाने कांद्यावर निर्धारित बंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.आशिया खंडात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात आघाडीवर असल्याने केंद्र शासनाने निर्यातबंदी मागे घ्यावी यासाठी शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे खा.गोडसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. यातूनच आज खासदार हेमंत गोडसे यांनी कांदा निर्यातदारांसह वाणिज्य विभागाचे सेक्रेटरी रोहित सिंग यांची भेट घेतली.
सध्या लाल कांद्याचा हंगाम आहे आठवडाभरात हा कांदा वापरला गेला नाही तर शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ येत असते.अशातच शासनाने पंधरा दिवसांपासून लागू केलेले निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.आज मितीस कांद्याला किलोमागे सोळा ते वीस रुपये पर्यंतच भाव मिळत आहे.नाशवंत अशा लाल कांद्याच्या हंगामात शासनाने निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जाण्याची भिती खा. गोडसे यांनी सिंग यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे.कांदा निर्यातबंदी व कांद्याच्या भावाविषयी निर्णय घेण्यासाठी कृषी,अर्थ,वाणिज्य,ग्राहक संरक्षण या चार विभागाने कायमस्वरूपी एक समिती गठीत करण्याची गरज असल्याची भावना यावेळी खासदार गोडसे यांनी व्यक्त केली.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने हटवावी अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी सिंग यांच्याकडे केली आहे.यावेळी मनीष बोरा,विकास सिंग,प्रसाद पेठकर आदी उपस्थित होते.