नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवज लंपास केला. रेहनुमा नगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड चोरुन नेली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुद्दतसर अली मोद्दीन सय्यद (रा. टावर नं.१ अपा.रेहनुमा स्कूलजवळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सय्यद कुटुंबिय १५ ते १८ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ३ लाख ४७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.
महिलेस मारहाण करीत विनयभंग…सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोकणीपूरा भागात वाद मिटविण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण करीत टोळक्याने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्तफा उमर कोकणी,जुबेर मुस्तफा कोकणी, जैद मुस्तफा कोकणी, अना जुबेर कोकणी व अन्य दोन जण (रा.सर्व कोकणीपूरा भद्रकाली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत बागवानपुरा भागात राहणा-या २३ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास कोकणी मसाला दुकान भागात ही घटना घडली.
संशयितानी गैर कायद्याची गर्दी जमवून मोहम्मद कोकणी यास शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी पीडिता कोकणी यांच्या मदतीला धावून गेली असता हा प्रकार घडला. वाद मिटवीत असतांना संशयितांनी तिला शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी महिलेचा विनयभंग करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.