नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेच्या पवित्र संकुलात काल काही खासदारांनी केलेल्या अपमानजनक नाट्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना दूरध्वनी करून खेद व्यक्त केला. आपण स्वत: वीस वर्षांहून अधिक काळ अशा अपमानांना सामोरे जात असल्याचे पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. मात्र उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीसोबत असे वर्तन घडणे आणि तेही संसद परिसरात घडणे, दुर्दैवी आहे असे पंतप्रधान म्हणाले.
काही व्यक्तींनी केलेली चेष्टा आपल्याला आपले कर्तव्य बजावण्यापासून आणि आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत तत्त्वांचा सन्मान जपण्यापासून रोखू शकणार नाहीत, असे उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांना सांगितले.
घटनात्मक मूल्यांप्रती वचनबद्धतेचा उपराष्ट्रपतींनी पुनरुच्चार केला. ‘कुठलाच अपमान आपल्याला आपल्या मार्गावरून विचलित करू शकणार नाही. असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.