नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे व सत्ता पक्षातील संघर्ष नवा नाही. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप दोन्ही बाजूने होत असतात. कधी त्यांना अब्रनुकसानीच्या दाव्याची धमकी मिळते तर कधी त्यांच्या कारलाही अडवले जाते. पण, आताचे प्रकरण मात्र वेगळे असून ते त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सत्ताधारीने त्यावर मात्र त्यांना एक संधी दिली असून ती संधी त्यांनी नाकारली तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल होणार आहे.
अंधारे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सभागृहात बोलू देत नाहीत असे वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल आता सत्ताधारी गटाने घेतली आहे. धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना सभागृहात उपस्थितीचा आणि चर्चेत सहभागाचा प्रश्च नाही. या पार्श्वभूमीवर अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे. धंगेकर हे विधानसभा सदस्य असून विधान परिषदेचे ते सदस्य नाही. नीलम गो-हे या सभापती विधान परिषदेच्या आहे. त्यामुळे धंगेकर त्यांच्या सभागृहाचे सदस्यच नाही. त्यामुळे त्यांना बोलून द्यायाचा किंवा न द्यायचा मुद्दाच येत नाही.
आता या प्रकरणात डॉ. गोऱ्हे यांनी अंधारे यांना आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रवीण दरेकर यांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, की अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते; पण स्वत:ला ज्ञानी समजणाऱ्यांना त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये, याचे आश्चर्य वाटते.