इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः भुजबळांची एका प्रकरणातून सुटका होते तर दुसरे प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतात. आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील तीन आरोपींची माफीचा साक्षीदार होण्याची विनंती न्यायालयाने मान्य केल्यामुळे छगन भुजबळ पुन्हा अडचणीत आले आहेत. या खटल्यातील तीन आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी घेण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने मान्य केली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिघांनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी भुजबळ यांच्यासह इतरांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी घेण्याआधी आमच्या अर्जावर निर्णय घ्यावा, ही नाईक, साळसकर आणि बलराज या तिघांची विनंती न्यायालयाने मान्य केल्यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहे.
काय आहे प्रकरण
मुंबईतील अंधेरी येथील ‘आरटीओ’च्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची परवानगी दिल्याच्या बदल्यात संबंधित कंपनीकडून दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी तसेच मुंबईतील मलबार हिल येथे विश्रामगृह बांधून घेण्याचे कत्राट भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना दिले होते. या कामाच्या निविदा काढल्या नाहीत. संबंधित कंपनीने नंतर इतर विकासक कंपनीशी करार करत विकासाचे हक्क विकले. राज्य सरकारच्या निकषांप्रमाणे कंत्राटदाराला २० टक्के नफा अपेक्षित असताना पहिल्या विकासकाला ८० टक्के नफा मिळाला. कंपनीने १९० कोटी रुपयांचा नफा कमावला. त्यातील १३ कोटी ५० लाख रुपये भुजबळ कुटुंबीयांना दिले, असा आरोप आहे.