खा. हेमंत गोडसे यांनी दिली ही माहिती
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे -नाशिक हा प्रस्तावित सेमी हाय स्पीड लोहमार्ग मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेल्या डीपीआर मधील त्रुटी दूर करून मध्य रेल्वे प्रशासनाने त्रुटीमुक्त असा सतरा हजार ८८९ कोटींचा तयार केलेला सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या रेल्वे बोर्डकडे सादर केला आहे. यापूर्वीचा डीपीआर सोळा हजार ३९ कोटी रूपयांचा होता. मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्रुटी मुक्त आणि परिपूर्ण असा सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे सादर झाल्याने आता लवकरच नाशिक – पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.
नाशिक -पुणे -मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. नाशिक – पुणे थेट लोहमार्ग नसल्याने त्या तुलनेने नाशिकचा विकास मंदावलेला आहे. यातूनच नासिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग व्हावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे सतत प्रयत्नशील आहेत. यासाठी गोडसे यांनी वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवून या लोहमार्गाचे सर्वेक्षण करून घेतले आहे. प्रस्तावित नाशिक – पुणे लोहमार्गास राज्य आणि केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पैकी राज्य आणि केंद्र प्रत्येकी २० टक्के तर इक्विलिटी मधून ६० टक्के निधी उपलब्ध होणार होता. असे असले तरी तयार करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि अपूर्ण प्रस्ताव असल्याचे लक्षात आल्याने दरम्यानच्या काळात मध्य रेल्वे प्रशासनाने सुधारित डीपीआर तयार करण्याची जबाबदारी एका विशेष एजन्सीला दिली होती.
सदर एजन्सीने नाशिक -पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावावर वर्षभर सखोल अभ्यास करून पूर्वीच्या डीपीआर मधील त्रुटी आणि चुका पूर्णतः दूर केल्या असून परिपूर्ण असा डीपीआर तयार केला आहे. नव्याने तयार करण्यात आलेला सुधारित अन परिपूर्ण डीपीआर मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या सुधारित डीपीआरनुसार नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वेलाईन साठी १७८८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.पैकी बांधकामावर १५ हजार ४१० कोटी, इलेक्ट्रीक कामावर १३७९ कोटी, सिंगल अँड कम्युनिकेशनच्या कामासाठी १०८६ कोटी तर मेकॅनिकल कामासाठी साडे बारा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.प्रकल्पाची एकूण लांबी २३३ किलोमीटर इतकी असणारा असून प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. नाशिक – पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीतून प्रतिवर्ष एक कोटी तीस लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.या रेल्वे लाईनमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार असून रस्ता अपघाताच्या तुलनेने अपघातात मोठी घट होणार आहे. उत्सर्जनाचा खर्च अत्यंत कमी होणार असून इंधनाची मोठी बचत होणार आहे.रोजगाराला चालना मिळणार असून रस्ते वाहन खर्चात मोठी बचत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.