इंडिया दर्पण ऑनाईन डेस्क
शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. मग त्याची वेगवेगळी कारणे असतात. पण, सध्या त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आहे. कारण गौरी खानच्या मागे ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ लागले आहे. गौरी खान ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या तुलसियानी ग्रुपने गुंतवणूकदार आणि बँकांना सुमारे ३० कोटींचा गंडा घातला आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ने गौरी खानला नोटीस पाठवली आहे.
लखनऊ येथील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची गौरी खान ब्रँड अॅम्बेसेडर आहे. लखनऊमध्ये सुशांत गोल्फ सिटीमध्ये या कंपनीचा एक प्रकल्प आहे. मुंबईतील किरीट शहा यांनी या प्रकल्पातील एक फ्लॅट ८५ लाख रुपयांना खरेदी केला; परंतु कंपनीने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. गुंतवलेली ८५ लाख रुपयांची रक्कमही परत केली नाही. शहा यांनी तुलसियानी समूहाचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.
गौरी खान हिने तुलसियानी ग्रुप प्रोजेक्टचा प्रचार केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवत शहा यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. तुलसियानी ग्रुप प्रकरणामुळे गौरी खान चर्चेत आहे. ३० कोटींचा गंडा घातल्याचा आरोप गौरीवर करण्यात आला आहे. त्या मुख्य आरोपी नसल्या, तरी तरी ती या प्रकरणाचा भाग आहे. २०१६ मध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते; पण पूर्ण पैसे घेतल्यानंतरही त्यांना अद्याप ताबा मिळालेला नाही.