इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे तृणमूल काँग्रेसच्या खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वकील अभिषेक गौतम यांनी डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ती स्वीकारली आहे. त्याआधारे तपासही सुरू करण्यात आला आहे.
अभिषेक यांनी आपल्या तक्रारीत बॅनर्जी यांच्यावर उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले, की काही वकिलांनी तक्रार दिली आहे. हे प्रकरण नवी दिल्ली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रार प्राप्त झाली असून ती नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण सभागृहाबाहेरचे असून तक्रारीवर कारवाई झाल्यास अटक होण्याची शक्यता आहे.
कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. निलंबित खासदारांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या ‘मकर गेट’वर आंदोलन केले. यादरम्यान, बॅनर्जी यांनी जगदीप धनखर यांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी घटनास्थळी उभे होते आणि बॅनर्जी हे धनखर यांची नक्कल करतानाचा व्हिडीओ बनवताना दिसले. त्याचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेनंतर धनखड यांनी वैयक्तीकरित्या दुखावल्याचे सभागृहात म्हटले आहे.