इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे गटाचे नाशिक शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेल्या सलीम कुत्ता यांचा एकत्र फोटो दाखवला. त्यानंतर डान्सचा व्हिडीओही व्हायरल केला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहे.
नाशिक पोलिसांनी मंगळवारी बडगुजर यांची सलग दीड तास चौकशी केली. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे उपस्थितीत होते. या चौकशीत बडगुजर यांनी पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कायदेशीर मदत घेणार असल्याचे सांगितले. बडगुजर यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.
गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सुध्दा चौकशीबाबत सांगितले की, बडगुजर यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी त्रोटक स्वरूपात उत्तरे दिली. काही प्रश्नांसाठी कायदेशीर मदत घ्यायची, असे सांगितले आहे. त्यासाठी वेळ मागितला आहे. आतापर्यंत व्हिडीओशी संबंधित १३ ते १४ जणांची चौकशी झाली. हा व्हिडिओ २०१६ सालचा आहे. कागदपत्रे समोर आल्यानंतर फार्म हाऊस कुणाचा आहे, हे समोर येईल. सलीम कुत्ता हा शिक्षाबंदी आरोपी आहे, त्यासाठी प्रक्रिया आहे. आम्हाला आवश्यक वाटल्यावर आम्ही जबाब घेऊ. सुधाकर बडगुजर यांच्याकडून चौकशीला सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.