नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेमध्ये आज झालेल्या घडामोडींबद्दल आपले दु:ख आणि व्यथा व्यक्त करताना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, आपल्या शेतकरी आणि जाट पार्श्वभूमीला लक्ष्य केल्यामुळे आपण वैयक्तिकरित्या दुखावले गेलो आहोत.
काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील खासदार पी. चिदंबरम यांना उद्देशून उपराष्ट्रपती म्हणाले, “एक संसद सदस्य (कल्याण बॅनर्जी) या सभापतींच्या संस्थेची खिल्ली उडवताना तुमचे ज्येष्ठ नेते (राहुल गांधी) त्याचे चित्रीकरण करीत होते . यामुळे माझ्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील, याची तुम्ही कल्पना करा. असे म्हणून त्यांनी चिदंबरम यांनाच पुढे विचारले, “संसदेचा एक वरिष्ठ सदस्य, दुसऱ्या सदस्याचा व्हिडिओ काढत आहे … हे कशासाठी?”
या देशावर दीर्घ काळ सत्ता गाजवणाऱ्या राजकीय पक्षाने राज्यसभेच्या सभापतींच्या संस्थेला नुकसान पोहोचवल्याचा निषेध करताना उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, हा केवळ शेतकरी आणि एका समाजाचा अपमान नाही, तर राज्यसभेच्या सभापतींच्या कार्यालयाचा अपमान आहे.’’