इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियातून केलेली टीका चांगलीच व्हायरल होत आहे. फक्त दोन ओळीत ही टीका केली आहे. त्यात म्हटले आहे की, ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले… टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही. या दोन ओळीबरोबरच त्यांनी अण्णा हजारे यांचा फोटो पोस्ट केला आहे.
अण्णा हजारे यांनी त्या काळात आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली अशी चर्चा नेहमी होत असते तोच संदर्भ घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यावर ही टीका केल्याचे बोलले जात आहे. खरं तर अण्णा हजारे भाजप सत्तेत आल्यापासून फारसे बोलत नाही. त्यामुळे भाजप विरोधी आघाडीतील नेते अधून मधून त्यांच्यावर टीका करत असतात. पण, आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष करत दोन ओळीतील बोचरी टीका केली आहे. त्यावर आता अण्णा हजारे काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे आहे.
याअगोदर मणिपुरच्या घटनेवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेस खा. संजय राऊत यांनी असाच चिमटा काढला होता, त्यावेळेस ते म्हणाले होते की, माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे हा देश वाचवायचा आहे. तुम्ही देश वाचवायची भूमिका घेतलेली आहे. आज खरी आंदोलनाची गरज आहे. अण्णा हजारे यांनी त्या काळात आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली. आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारांविरोधी अण्णांनी आवाज उठवावा आणि ही गरज आहे.