नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकामाचा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिका-याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामसेवक मनोहर जगन्नाथ हिरे हे सुरगाणा तालुक्यातील हेमाडपाडा ग्रामपंचायत येथे कार्यरत होते. तक्रारदार यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधावयाची असल्याने त्यांनी वडीलांच्या कागदपत्रांची फाईल तयार करून ती ग्रामसेवक हिरे यांच्याकडे दिली. त्यावेळेस हिरे यांनी कागदपत्रे तपासून प्रकरण दाखल करून मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय तालुका सुरगाणा यांच्याकडे पाठवण्याकरता तक्रारदार यांच्याकडून पाच हजाराची लाच स्विकारली. त्यावेळेस ते रंगेहात सापडले. ही घटना १९ डिसेंबर २०१६ ची आहे.
त्यानंतर न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. आज त्याचा निकाल आला असून त्यात हिरे यांना दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरी शिक्षा व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदन विठ्ठल बगाडे ला.प्र.वि. नाशिक यांनी केला असून तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा आदमाने यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. सदर खटल्याचे कामकाज कोर्ट अंमलदार पोहवा प्रदीप काळोगे व ज्योती पाटील यांनी बघितले.