नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) कारखान्यातून चोरी करणा-या कामगारास पकडण्यात यश आले आहे. पीव्होट रिनिफ पार्ट चोरून नेतांना त्यास रंगेहात पकडण्यात आले असून त्यास पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर जलील शेख (३३ रा.बागवानपुरा जुने नाशिक) असे संशयित कामगाराचे नाव आहे. याबाबत ऑल्फ इंजिनिअरींग प्रा.लि. अंबड या कारखान्याचे शरद आव्हाड (रा.ज्ञानेश्वर नगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ऑल्फ इंजिनिअरींग या कारखान्यातील संशयित कंत्राटी कामगार असून सोमवारी (दि.१८) दुपारी तो चोरी करतांना मिळून आला.
कारखान्यातून सुट्टी झाल्यानंतर त्याच्या अंगझडतीत सुमारे ५० हजार रूपये किमतीचे पीव्होट रिनीफ पार्ट मिळून आले. संशयितास पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
कारची काच फोडून लॅपटॉप चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक पुणे मार्गावरील दत्तमंदिररोड भागात पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप चोरून नेला.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश प्रभाकर छत्रे (रा.जवाहर कॉलनी,अरिहंतनगर औरंगाबाद) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. छत्रे सोमवारी (दि.१८) कामानिमित्त शहरात आले होते.
दत्तमंदिररोडवरील हल्दीराम स्विटस दुकानाच्या बाजूला कार पार्क करून ते काही अंतरावर कामानिमित्त गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारची काच फोडून पाठीमागील आसनावर ठेवलेला सुमारे २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.