इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आता राहिलेल्या दीड दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल. दरम्यान, शिवसेनेत एकाएकी फूट पडलेली नाही. तो नियोजनबद्ध राजकीय कटाचा भाग असल्याचा युक्तिवाद ॲड. देवदत्त निकम यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील हा युक्तिवाद सुरू आहे. २० आणि २१ जून २०२२ ला जे घडले, ते एका रात्रीत होत नाही. यासाठी मोठा कट रचला होता, असे सांगून शिवाजी महाराज गेले म्हणून आम्ही सुरतला गेलो, हे शिंदे गटांचे म्हणणे धादांत खोटे आहे.
राजकीय महत्त्वकांक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन त्यांचा अवमान केला जात आहे, ॲड निकम म्हणाले.
सर्व आमदार एकाच वेळी निघतात. एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये जातात आणि विरोधीपक्षाला पाठिंबा द्यायला तयार होतात, हे एकाएकी शक्य होत नाही. राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसार विधिमंडळ पक्ष काम करत नसेल, तर त्यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, असा युक्तिवाद केला. पक्षाच्या अध्यक्षांचे विचार पटत नसतील, तर लोकशाहीने निवडणूक घेऊन त्यांना हटवण्याचे अधिकार दिलेले आहेत, असे निदर्शनास आणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी होऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.