नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीत किरकोळ विक्रेत्यांना माल पुरविणा-या वितरकाच्या दुचाकीला लावलेली सिगारेटची बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेत विविध कंपनीची तब्बल ८८ हजार रूपये किमतीची सिगारेट पाकिटे चोरट्यांनी लांबविली असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष दत्तात्रेय दशपुते (रा.अंबिकानगर,कामटवाडारोड सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दशपुते किरकोळ विक्रेत्यांना विडी सिगारेट व अन्य वस्तू पुरविण्याचे काम करतात. शुक्रवारी (दि.१५) ते नेहमी प्रमाणे सातपूर औद्योगीक वसाहतीत गेले होते. एमआयडीसीतील कुमार बार भागात दुचाकी पार्क करून ते माल देण्यासाठी नजीकच्या व्यावसायीकाकडे गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली सिगारेची बॅग चोरून नेली. या बॅगेत ८८ हजार २०४ रूपये किमतीची विविध कंपन्यांची सिगारेट पाकिटे होते. अधिक तपास जमादार गावित करीत आहेत.