नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशे वीस करण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली आहे. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे, तर, ओडिशातील राऊरकेलामधील रुग्णालयात खाटांची संख्या ७५ वरून दीडशे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.