निलेश गौतम
डिसेंबर महिन्यातील कार्तिक अमावष्येला सुरू होणारा डोंगऱ्या देव उत्सव ग्रामीण आदिवासी भागात मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे .श्री दत्त पौर्णिमेला सांगता होणारा हा उत्सव आदिवासी बांधवांच्या जीवनातील एक अमूल्य असा श्रद्धेचा उत्सव मानला जातो…
मुख्य माऊली, ठाळकर, (थाळी वादक)पावकर(पावरी वादक), टापरी(बांबू वादक) खुट्या (लोखंडी चिमटा वादक) आणि अन्य सर्व माऊली असा एकत्र एका वस्तीचा हा दर तिसऱ्या वर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आदिवासीच्या जीवनातील सचोटी पाहणारा काळ म्हणून ही पहिला जातो.
सर्व अडीअडचणीवर मात करून घरातील मुख्य पुरुषाने या उत्सवात सहभागी होणे अनिवार्य असते यासाठी या आदिवासी बांधवांना आपल्या कामकाजाचे सर्वच नियोजन महिनाभर आधी करावे लागते.
आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणून डोंगऱ्या देव उत्सवांकडे बघितले जाते. वर्षभर जंगलात रानात, काबाड कष्ट ,मोलमजुरी करतांना जंगलातील , डोंगर दरी कपारातील दैवत आपली पाठराखण करत असतात त्याच्या प्रती कृतज्ञाता म्हणून गेली शकडो वर्ष हा सण आदिवासी बांधवांकडून साजरा केला जातो.
या साठी हे सर्वच सहभागी आदिवासी बांधव या डोंगऱ्या देव उत्सवाचे कडक नियम पाळताना दिसतात. यामध्ये प्रामुख्याने १० दिवस हे सर्व जण एकत्र राहत वस्तीतील मुख्य जागेवर त्यांच्या देवतांची स्थापना करून रात्री याच ठिकाणी पारंपरिक नृत्य व गाणे म्हणून जागरण करतात तर १० दिवस उपवास करतात यामध्ये सकाळी एक वेळी गुळ शेंगदाणे खाऊन संपूर्ण दिवस आजू बाजूच्या परिसरतील वाड्या ,वस्ती, गावांमध्ये आपला सर्व लवाजमा सह फिरतांना दिसतात गावातील व वस्ती वरील शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबे या आदिवासी बांधवांचा सन्मान करीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख वर्गणी, किंवा या सर्व माऊलींसाठी चहा,पाणी व फराळाची व्यवस्था करतांना दिसतात अतिशय कडक आणि शिस्तीचे दर्शन या वेळी या बांधवांकडून होते तर अनेक कुटुंबातील लहान बालकांना ही या काळात लोक यांचे हातात आनंदाने देत देऊन आशीर्वाद घेतांना दिसतात.
काय नियम पाळतात या १० दिवसात हे बांधव
दिवसभर फिरून आल्यावर रात्री मुख्य देवतांची स्थापना असलेल्या ठिकाणी अविवाहित मुलींनीच केलेल्या स्वयंपाकने आपला उपवास सोडवितात.
हा स्वयंपाक ही बिगर तेलाची भाजी भाकरी खाऊन हा उपवास सोडविला जातो. पहाटे ४ वाजता उठून नदीकिनारी थंड पाण्याने अंघोळ करून देवतांची पूजा करतात तर रात्री उपवास सोडविण्याची वेळी ही थंड पाण्याने अंघोळ करतात. या काळात या बांधवांच्या घरी ही घरातील कुठलाही सदस्य हा तेल मिश्रीत कुठलेही अन्न सेवन करत नाही, डोक्याला तेल लावत नाही, डोक्याचे केस विंचरले जात नाही हिरव्या पालेभाज्या खाल्या जात नाही. तर पौर्णिमेच्या दिवशी या सर्व माऊली डोंगरावर जात आपल्या देवतांची पूजा करीत मुक्कामी राहत दिवा लावत दुसऱ्या दिवशी घरी येत कार्यक्रमाची सांगता भंडारा ने करतात या भंडाऱ्यात बोकड बळी देऊन कार्यक्रमांची सांगता करतात.