नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पुणे मार्गावरील शिंदे टोलनाका भागात भरधाव दुचाकी घसरल्याने नंदूरबार येथील २४ वर्षीय तरूण ठार झाला. या अपघातात अन्य दोन तरूणही जखमी झाले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मनिष रतीलाल पाडवी (२४ रा.कुंडल,खुंटामोडी ता.धडगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. पाडवी मंगळवारी (दि.१२) रात्री दोन तरूणांना आपल्या दुचाकीवर बसवून नाशिक पुणे मार्गावर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पल्सर दुचाकीवरून तिघे मित्र जात असतांना शिंदेगाव टोलनाका भागात भरधाव दुचाकीचे अचानक ब्रेक दाबल्याने ही घटना घडली.
या अपघातात भरधाव दुचाकी घसरल्याने पल्सरस्वार पाडवी याचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले असून,त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिस नाईक संतोष पाटील यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.
७५ वर्षीय वृध्दाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमृतधाम परिसरात राहणा-या ७५ वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर वृध्दाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशोक नरहरी नायक (रा.गजानन बंगला,औदुंबर नगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. नायक यांनी रविवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाचा मिथील परदेशी यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.