मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई बाँबस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरु असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची चौकशीही करावी, अशी मागणी करत फोटो दाखवत आक्रमपणे भूमिका मांडली. त्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज काही वेळ तहकूब करण्यात आले.
विधान परिषद सभापती निलम गो-हे यांनी यावेळी सरकाराची सारवासारव करुन नंतर कामकाजातून हे सर्व आरोप काढून टाकले. यावेळी निलम गो-हे यांनी अंबादास दानवे, अनिल परब यांना या विषयावर आक्रमक भूमिका घेतली.
अशी चालु आहे एकमेकांना मदत
सलीम कुत्ता याच्यासोबत मेजवानी केल्याचा आरोप करीत भाजपने शिवसेनेच्या ठाकरे गटाची कोंडी केली. त्यावेळी भाजपच्या मदतीला शिवसेनेचा शिंदे गट आला, या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट धावला आहे. महाजन आणि खडसे या दोन नेत्यांत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप होत असून आता दाऊदच्या निकटवर्तीयाशी महाजन यांचे संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
याअगोदर खडसे म्हणाले
खडसे म्हणाले, की तथ्य नसताना माझ्यावर दाऊदच्या बायकोसोबत संभाषण झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. माझी चौकशी करण्यात आली होती. महाजन यांचा सलीम कुत्ता याच्यासोबतचा फोटो बाहेर आला आहे. देशद्रोहींशी त्यांचे संबंध आहे का, याची चौकशी करा. माझ्यावर आरोप झाले, त्या वेळी पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता महाजन यांच्यावरचे आरोप पुराव्यानिशी होत आहेत. मंत्रिमंडळात असताना महाजन यांची चौकशी करणे योग्य नसल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा.