नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरुध्द एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. याअगोदर त्यांची दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ताशी संबध असल्या प्रकरणी चौकशी सुरु असतांना हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नगरसेवक असताना पदाचा दुरुपयोग करत जवळच्या कंपनीला पालिकेतील कामांचे कंत्राट दिल्या प्रकरणी तात्कालिन पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीनंतर आज सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुचर यांनी राजकीय सुडातून हे सगळं सुरु असल्याचे सांगितले.
एसबीनी दिली कारवाईची ही माहिती
नाशिक महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी नाशिक महानगर पालिकेचे नगरसेवक सुधाकर भिका बडगुजर यांचे विरुद्ध दिलेल्या पत्राचे अनुशंगाने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे उघड चौकशी चालु होती, सदर उघड चौकशीच्या अनुशंगाने यातील सुधाकर भिका बडगुजर यांनी मे. बडगुजर अॅंण्ड कंपनीतून डिसेंबर २००६ मध्ये निवृत्ती घेतल्याबाबतची खोटी व बनावट कागदपत्रे बनवून, त्यांनी नाशिक महानगर पालिकेत सन २००७ पासून नगरसेवक व इतर पदे भूषवून बडगुजर अॅंड कंपनीस नाशिक महानगर पालिकेकडून विविध ठेके मिळवून देवून स्वतः बडगुजर अॅन्ड कंपनीकडून सन २००६ ते सन २००९ या कालावधीत रक्कम रुपये ३३६९४३९ रुपये स्विकारुन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेवून इतर दोन साथीदार यांचेसोबत संगनमत करुन नाशिक महानगर पालीकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने सुधाकर भिका बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३ (१) (ड) (i)(ii), १३ (२) सह कलम भा.द.वी. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सलीम कुत्ताच्या संबधावरुन एसआयटी
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दहशतवादी दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पॅरोलवर असताना पार्टी करणे सलगी ठेवणे आणि डान्स करणे असे आरोप सुधाकर बडगुजरवर भाजपचे आमदार नितेश राणे व पालकमंत्री भुसे यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानतंर बडगुजर यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेत या आरोपाचे खंडण केले. सलीम कुत्ता बरोबर माझा कधीही संबध नव्हता राजकीय हेतून आरोप केले आहेत. माहिती घेऊन आरोप केलेले नाही. माझे संबध अगोदर नव्हते..आताही नाही. सार्वजनिक जीवनामध्ये एखादया ठिकाणी भेट झाली असेल त्याची मला माहित नाही असे त्यांनी सांगितले.