इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली. भारतात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट मिळाला आहे. कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला धोक्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि त्यामुळे झालेल्या मृत्युमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाचा सबव्हेरिएंट जेएन.१ ची पहिली केस केरळमध्ये मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मॉक ड्रिल करण्यात आले. मुखपट्टी, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी तयार राहण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.
सिंगापूरमधून भारतात आलेल्या एका प्रवाशामध्ये जेएन १ हा कोरोना व्हेरिएंटचा उपप्रकार आढळून आला. २५ ऑक्टोबरला ही व्यक्ती सिंगापूरला गेली होती. ती तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील आहे. हा वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथे एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याचे काम सुरू केले आहे. केरळमधील घटनेनंतर खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ताप असणाऱ्यांना विलीनीकरणात राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना विलीनीकरणात ठेवा, मुखपट्टी आणि सॅनिटायझर सक्तीचे करण्यात आले आहे.