इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि त्यांना संबोधितही केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा कंदील दाखवला.
विकसित भारत संकल्पयात्रेच्या मुंबईतील एक लाभार्थी- मेघना या खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालवणाऱ्या एक एकल माता आहेत. मुद्रा योजनेतून त्यांना मिळालेल्या 90,000 रुपयांच्या कर्जाने त्यांच्या आयुष्यात घडून आलेल्या परिवर्तनाची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. या कर्जातून त्यांनी व्यवसायासाठी लागणारी भांडी घेतली आणि व्यवसाय पुढे नेला. त्यानंतर मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. तो मुलगा सध्या फ्रान्समध्ये शिकत आहे आणि मेघना यांनी मुद्रा आणि स्वनिधी योजनांच्या मदतीने खाद्यपदार्थांचा व्यवसाय वाढवला आहे.
कर्जासाठीची अर्जप्रक्रिया सोपी झाल्याच्या अनुभवाबद्दल पंतप्रधानांनी चौकशी केली असता मेघना यांनी सांगितले की त्यांना अर्ज केल्यापासून आठ दिवसांत कर्ज मिळाले आणि त्या अगदी वेळेवर त्याची परतफेड करत असतात. स्वनिधी योजनेअंतर्गत आधीच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळत असल्याची माहिती देत, ‘आणखी कर्जासाठी अर्ज केला आहे का’- अशी चौकशी पंतप्रधानांनी मेघना यांच्याकडे केली. यावर उत्तर देताना मेघना यांनी भविष्यात आणखी कर्ज घेण्याची इच्छा व्यक्त केली. स्वतःच्या खाद्य-उद्योगात 25 स्त्रियांना रोजगार दिल्याची माहितीही मेघना यांनी यावेळी दिली.
पीएम कौशल्य विकास योजनेअंतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगत, तेथे शंभर स्त्रियांना रोजगार मिळाल्याचेही त्या म्हणाल्या. त्याद्वारे त्या अमेरिका आणि कॅनडाला रजयांची निर्यात करत आहेत असेही त्यांनी सांगितले. उपलब्ध असणाऱ्या सर्व सरकारी योजनांसाठी मेघना यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले आणि समाजातील अन्य लोकांनाही या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या नेहमी उद्युक्त करत असल्याचे त्या म्हणाल्या. ‘मेघना यांचे यश म्हणजे केवळ त्यांच्या एकटीचा फायदा नसून अन्य स्त्रियांनाही त्यातून वरदान मिळाले आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. तसेच, अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच विद्यमान केंद्र सरकार काम करत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.