इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये बरेली महापालिकेबाहेर आंदोलनाला बसलेल्या दाम्पत्याच्या एका वर्षाच्या निष्पाप मुलीचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या मागणीसाठी हे दाम्पत्य इतर ग्रामस्थांसह अनेक दिवस आंदोलन करीत होते. उघड्यावर बसल्यामुळे या मुलीला थंडी वाजली होती. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आता मुलीच्या मृत्यूनंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्या असून, त्यानंतर आंदोलन संपवण्यात आले आहे.
परसाखेडा गौतिया गावाशी संबंधित हे प्रकरण आहे. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही गावात रस्ता नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी गावातील लोक वेळोवेळी विविध मंचावर प्रश्न मांडत आहेत. असे असतानाही आजपर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेने पुढाकार घेतला नाही. ग्रामस्थांना रस्त्याअभावी दररोज रेल्वे रूळ ओलांडावे लागते. आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. या वेळी ग्रामस्थांनी एकहाती लढण्याचा निर्णय घेत मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
याच गावातील रहिवासी हरीश चंद्र हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. हरीशच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नीही इतर गावकऱ्यांसोबत या आंदोलनात सहभागी झाली होती. त्यांच्या मांडीवर एक वर्षाची मुलगी विद्या होती. महापालिकेच्या गेटवर धरणे धरून बसले होते. अशा स्थितीत रात्री थंडीमुळे त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली. सकाळी ते आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरांकडे गेले. तिथे तिला न्यूमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर ते आपल्या मुलीला घेऊन खासगी रुग्णालयात जात होते; मात्र वाटेतच मुलीचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच एकच गोंधळ उडाला.