इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रायपूरः छत्तीसगडमधील सुकमा येथे रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचा सहायक पोलिस निरीक्षक हुतात्मा झाले. एक जवान जखमी झाला.
बेद्रे कॅम्पमधून सैनिक शोधासाठी बाजाराकडे निघाले होते. त्या वेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे प्रकरण जागरगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. चार दिवसांत जवानांवर झालेला हा तिसरा नक्षलवादी हल्ला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजता बेद्रे गावात केंद्रीय राखीव दलाच्या १६५ व्या बटालियनचे जवान शोधासाठी निघाले होते. जवान बाजारमार्गे उरसंगळच्या दिशेने शोध घेत होते.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली; मात्र वेळीच सावध झालेल्या जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सुधाकर रेड्डी हुतात्मा झाले, तर दुसरा जवान रामूला गोळी लागली. तो गंभीर जखमी झाला आहे. सहकारी सैनिक त्याला कॅम्पमध्ये घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना एअरलिफ्टद्वारे रायपूरला नेण्याची तयारी सुरू आहे. चकमक थांबल्यानंतर जवानांनी परिसराची झडती घेतली. या वेळी घटनास्थळावरून ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलिस चौकशी सुरू आहे.









