इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भंडाराः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जिभ आज घसरली. पटोले यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बाप काढला आहे. पटोले यांच्या या विधानावरून आता वाद होण्याची शक्यता आहे.
मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना पटोले यांनी जरांगे यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल ढासळला. जरांगे पाटील मला कुणबी प्रमाणपत्र मागतात; परंतु ज्यांच्या बापचे प्रमाणपत्र मराठा असेल, आजोबाचे प्रमाणपत्र मराठा आहे, त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र कशाला हवे? असा सवाल पटोले यांनी केला. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे यांनी जरांगे यांना अंगावर घेतल्यानंतर आता पटोले यांनीही तेच केले.
पटोले म्हणाले, की जात प्रमाणपत्र घेताना वंशावळ द्यावी लागते. ओबीसीची कागदपत्रे नसतील तर प्रमाणपत्र मिळणार नाही. आरक्षणाच्या विषयामुळे महागाई, बेरोजगारी आदी मूलभूत प्रश्न बाजूला गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न विसरले. पटोले यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोध केल्यामुळे मराठा समाजाच्या निशाण्यावर ते आले आहेत.