पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाने सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
या पुस्तक प्रदर्शनातील २५० दालनात २० पेक्षा अधिक भाषांमधील २० लाख पुस्तके उपलब्ध आहे. महोत्सवात १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे हा सोहळा आगळा वेगळा ठरला आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, शहीद भगतसिंह यांचे पणतू यादवेंद्रसिंग संधू, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
पुणे पुस्तक महोत्सवासारखा जनतेचा सोहळा इतरत्र पाहिला नसल्याचे नमूद करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने पुस्तकांशी संवाद घडतो. पुस्तक मार्गदर्शन करतात, सांत्वन करतात, विचार देतात, समाजातील एकोपा वाढवितात. त्यामुळे पुस्तक वाचनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उदारीकरणाचा फायदा मध्यमवर्गाला होत असल्याने शिक्षणाचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, डिजिटल माध्यमांमुळे वाचन संस्कृतीला धक्का पोहोचतो आहे, असेही त्या म्हणाल्या.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि पुण्याच्यादृष्टीनेही महत्वाचा असा हा पुस्तक महोत्सव आहे. महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक विद्यार्थी आणि पालकांना मोफत देण्यात येणार आहे. चांगल्या गोष्टींमध्ये सहभाग ही पुण्याची संस्कृती असल्याने महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री.मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सव साहित्य , कला आणि खाद्य संस्कृतीचा महोत्सव असून २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ग्रंथ चळवळीशी संबंधित सर्व घटकांना एका ठिकाणी आणून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. भांडारकर संशोधन संस्थेतील ज्ञानभांडार अनुवादित करून देशभरात पोहोचविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुस्तक न्यास करेल, असे त्यांनी सांगितले.
श्री.संधू म्हणाले, शहीद भगतसिंग यांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गीत लिहिल्यावर महाराष्ट्र आणि त्यांच्या कुटुंबाचे नाते जोडले गेले. त्यांनी कारागृहात असताना शंभरपेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन केले. त्यांनी लिहिलेली जेल डायरी पुणेकरांना पाहता यावी यासाठी महोत्सवात ठेवण्यात येत आहे. या डायरीच्या दर्शनाने युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करतानाच पुणे पुस्तकांचे केंद्र म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक श्री.मलिक म्हणाले, देशातील कोणत्याच पुस्तक महोत्सवात स्थापित झाले नाहीत असे चार विश्वविक्रम पुण्याच्या महोत्सवात होत आहे. पुण्याला जगातील पुस्तकांची राजधानी म्हणून स्थापित करण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यास सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी राज्य शासनाचे विशेष सहकार्य मिळल्याचेही ते म्हणाले.
श्री. संधू यांच्या हस्ते ‘हिंदवी स्वराज्य स्थापना- शिवराय छत्रपती झाले’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तके महोत्सवाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी सकाळपासून १० हजार पुस्तक प्रेमींनी प्रदर्शनाला भेट दिली.
कार्यक्रमपूर्वी विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्या-त्या देशाचे नृत्य आणि संगीत सादर केले. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ या १८ हजार ७५१ पुस्तकांनी ‘जयतू भारत’ हे जगातील पुस्तकांनी बनलेले सर्वात मोठे वाक्य बनवून विश्वविक्रम साकार करण्यात आला. यापूर्वीचा विक्रम ११ हजार १११ पुस्तकांचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगोरीकर यांनी याबद्दलचा निकाल जाहीर केला व आयोजकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले.