नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार जणांच्या टोळक्याने १८ वर्षीय तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रोकडोबावाडी भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारी उर्फ मारूती उर्फ जय वाल्मिक घोरपडे (रा.सुंदरनगर,देवळालीगाव),संदेश राजू मांगकाली उर्फ झिंग्या (रा.रोकडोबावाडी,ना.रोड) व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहे. याबाबत अरमान मुन्नवर शेख उर्फ अम्मू (रा. सुंदरनगर देवळाली गाव) या युवकाने फिर्याद दिली आहे. अम्मू शेख गुरूवारी (दि.१४) रात्री रोकडोबावाडी भागात गेला असता ही घटना घडली.
संशयित टोळक्याने पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला आहे. यावेळी संतप्त टोळक्याने शेख याच्या सोबत असलेल्या मित्राच्या घरात शिरून मोबाईल फोडून नुकसान केले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.
६४ वर्षीय वृध्देची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद भागात राहणा-या ६४ वर्षीय वृध्देने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. वृध्देच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
छाया लक्ष्मण निकम (रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,स्वामीनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. छाया निकम यांनी शुक्रवारी (दि.१५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच मुलदा सुमीत निकम याने तातडीने धाडीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना रात्री वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ.सचिन तांबे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.