मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आज अदानी विरोधात विराट मोर्चा काढला असून त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेसह शिवसेनेचे प्रमुख नेते सामिल झाले आहे. या मोर्चात दीड लाखाहून अधिक लोक सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या मोर्चात टीडीआर देण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याच्या मागणीसह एकुण सात मागण्या करण्यात आल्या आहे. धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा, निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या
‘टीडीआर’साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी, पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत द्या, झोपडपट्टीत अनेकांचे व्यवसाय चालतात त्यांचे पुनर्वसन करा, नव्याने सर्वेक्षण करा, निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करा, प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या या प्रमुख मागण्या आहे.
या मोर्चामुळे बीकेसीच्या भारत नगर येथील अदानी बिल्डिंगला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. धारावी ते बीकेसीपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ ते ५ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी ३०० च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.