नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात पॉलीश करण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी वृध्देचे सुमारे दीड लाखाचे अलंकार हातोहात लांबविल्याची घटना घडली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शना सुरेश गोयल (६० रा.मॉडर्न स्कूल मागे,हनुमान मंदिराजवळ अशोकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोयल शुक्रवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास घरात एकट्या असताना दोघा भामट्यानी त्यांना गाठले. यावेळी भांडी आणि दागिण्यांना पॉलीश करून देत असल्याचे सांगितल्याने त्यानी संशयितांच्या ताब्यात अलंकार दिले असता ही घटना घडली.
दागिणे उजळविण्याचा बहाणा करून भामट्यांनी त्यातील सुमारे १ लाख ५३ हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. ही बाब संशयित कामाचा मोबदला घेवून घराबाहेर पडल्यानंतर निदर्शनास आली. त्यामुळे गोयल यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.