नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. या दोन घरफोडीत एक घरफोडी भरदिवसा झाली. या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. याबाबत अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना जेलरोड भागात घडली. सुहास भास्कर राठोड (रा.लंबोधर सावता माळी स्विटच्या मागे,नारायण बापू नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठोड कुटूंबिय गुरूवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरून नेली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील एका कारखाना आवारात घडली. येथे वास्तव्यास असलेले गोपाळ मंगा वारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वारे कुटुंबिय अंबड एमआयडीसीतील सुपर निल पाईप कंपनीच्या आवारात वास्तव्यास आहे. गेल्या ३० सप्टेंबर रोजी वारे बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६६ हजार ८२० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.