नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खो-खो फेडरेशन च्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेला आजच्या चवथा दिवशी मुलांचे आठ आणि मुलींचे आठ उपउपांत्यपूर्व सामने खेळविले गेले. महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी विजय मिळवत आपल्या अंतिम विजयाच्या दिशेने उपउपांत्य फेरीचा पहिला टप्पा आरामात पार केला.
मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे तेलंगणा संघाला १८ – ०८ अश्या दहा गुण आणि एक डाव राखून मोठा विजय साजरा केला. यामध्ये महाराष्ट्राच्या विश्वजित कुसाळे याने अष्टपैल खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने आपल्या बचावात पहिल्या सत्रात १.३० मिनिटे पळून काढली, तर दुसऱ्या डावातही १.२० मिनिटे आपले संरक्षण केले, तर अक्रमणामध्ये एक गडी टिपला. अक्रमणामध्ये गणेश बोरकर ने जोरदार धाव घेत तब्बल आठ गडी बाद करून विजयाचा पाया रचला. याच बरोबर जितेंद्र वसावे (३.२० मिनिटे संरक्षण), रमेश वसावे (२.४० मिनिटे संरक्षण आणि एक गडी), चेतन बिका (१.४० मिनिटे आणि दोन गडी बाद) यांनीही मोलाची कामगिरी केली.
मुलांच्या इतर सामन्यात दिल्लीने मध्य प्रदेशला १८-१० असे पराभुत केले., केरळने उत्तरखंड ला पराभुत केले, तर तामिनाडूने ओरीसाला, छत्तीस गड ने हिमाचल प्रदेश ला, हरियाणाने पंजाबला कर्नाटकने जम्मू- काश्मीरला आणि उत्तर प्रदेशने गुजरातला पराभूत करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर खेळल्या गेलेल्या मुलांच्या उपउपांत्य सामन्यांमध्ये केरळ संघाने दिल्ली संघाला १६-१५ असे एक गन आणि २. मिनिटे राखून विजय मिळविला. तर तामिळनाडू संघाने छत्तीसगड संघावर १८-१३ अश्या पाच गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेशमिळविला. तर तिसऱ्या सामन्यात कर्नाटक संघाने उत्तर प्रदेश संघाचे आव्हान १०-९ अश्या एक गुण आणि १. मिनिटे राखून परतवून लावले. तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने हरियाणा संघावर एक डाव आणि नऊ गुणांनी मात करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यामध्ये जितेन्द्र वसावे ( २. मिनिटे आणि एक गाडी बाद), गणेश बोरकर (दोन मिनिटे आणि तीन गाडी बाद), अजय कश्यप याने २.१० मिनिटे आणि दोन गडी टिपले.
मुलींच्या गटात उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने जम्मू- काश्मीर संघाला सहज पराभूत करून उपउपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राबरोबर पंजाब, मध्य प्रदेश, बंगाल, हरियाणा, केरळ, कर्नाटक आणि गुजराथ या संघानी उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. यानंतर मुलीच्या गटात खेळल्या गेलेल्या उपउपांत्य सामन्यात महाराष्ट्राची गाठ पंजाब संघाविरुद्ध झाली. या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून हा सामनाही जिंकून पहिल्या चार संघामध्ये म्हणजे उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. पश्चिम बंगाल संघाने मध्य प्रदेश संघावर १८- ०० असा मोठा विजय मिळवून उपांत्य फेरी पक्की केली. मुलींच्या अन्य उपउपांत्य लढतीत पश्चिम बंगाल संघाने मध्य प्रदेश वर विजय मिळविला,
या स्पर्धेला नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम, गोगाबाबा नागरी सहकारी पत संस्थेचे चेअरमन उमेश कोठुळे, संचालिका संगीता कोठुळे, आणि रुपाली कोठुळे, वास्तू तथास्तु ग्रुप आणि साई इंटरप्राइजे संचालक नीरेन देवकर या मान्यवरानी या स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. उद्या सकाळी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार असून दुपारी या स्पर्धेचे अंतिम सामने खेळविले जातील अशी माहिती या स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख प्रेमचंद चौधरी यांनी दिली.
या स्पर्धा खो-खो साठी असलेल्या अधितकृ मॅटच्या चार मैदानावर खेळविल्या जात आहेत. मैदान व्यवस्था चोख राखण्यासाठी खो- खो पदाधिकारी मंदार देशमुख जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गर्दर्शनाखाली सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच प्रमुख प्रेमचंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंच व्यवस्थित पार पाडत आहेत.
या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.
उद्या होणारे उपांत्य सामने : –
मुले :- १) महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक २) केरळ विरुद्ध तामिळनाडू
मुली – १) महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल २)केरळ विरुद्ध कर्नाटक