नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा परिषदेककडून २०१९ साली विविध संवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती. या परीक्षेसाठी मे. न्यासा या कंपनीकडे उमेदवारांनी अर्ज केले होते, परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क देखील मे न्यासा या कंपनीकडे जमा होते, हे परीक्षा शुल्क ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेस प्राप्त झाले, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क हे तत्काळ खात्यावर जमा करावे असे निर्देश दिले होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थीच्या परीक्षा अर्जांची पडताळणी करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने न्यासा कंपनीशी समन्वय साधून एकूण १६ हजार १११ अर्जांची पडताळणी करण्यात आली. यापैकी १४ हजार ३१३ अर्ज हे पडताळले गेले. यापैकी १७२९ अर्जांची अंशत: पडताळणी झाली तर परीक्षार्थीच्या २६३५ अर्जांची पडताळणी होऊ शकली नाही.
न्यासा कंपनीच्या वतीने पडताळणी झालेल्या १४ हजार ३१३ परीक्षार्थीच्या खात्यावर प्राप्त ५३ लक्ष १९ हजार रुपयांचे परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २९ लक्ष ३२ हजार ५०० रुपयांचे परीक्षा शुल्क हे परत करण्यात आले असून इतर बँकांशी संलग्न २३ लक्ष ८६ हजार ५०० रुपयांचे परीक्षा शुल्क हे येत्या २ दिवसात जमा होणार आहे. उर्वरित बँक तपशील पडताळणी न झालेल्या उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाशी २५९१०१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून परीक्षा अर्ज व बँक खात्याची पुष्टी करावी असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.