इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पुन्हा गॅस सिलेंडरच्या दराच्या सबसिडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या सबसिडीचा फायदा उज्ज्वला योजनेतील नागरिकांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली.
या अगोदर केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना २०० रुपये सबसिडी दिली जात होती. आता आणखी १०० रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त ६०० रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे.
२९ ऑगस्टला केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे देशभरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. तेव्हा ती सर्वांसाठी होती. आता केवळ उज्वला योजनेतील नागरिकांसाठी ही घोषणा केली आहे.