नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीला आता सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दोन लाखांहून अधिक कागदपत्रे आणि आमदारांच्या म्हणण्यावर इतक्या कमी वेळात निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. त्यानंतर आज ही मुदतवाढ देण्यात आली.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. काही दिवसांपासून सुनावणीच्या वेळी अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही बाजूंकडून उलटतपासणी घेतली जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मुदतीत निकाल देणे अशक्य आहे. त्यामुळे निकालासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. या काळात विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेची सुनावणी घ्यावी लागत आहे. अध्यक्षांची तारेवरची कसरत होत आहे. त्यांना अधिवेशनाचे कामकाज, आमदार अपात्रेतची सुनावणी अशी कामे एकाच वेळी करावी लागत आहेत. त्यातच शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने आमदार अपात्रता प्रकरणावर शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. आता अंतिम सुनावणी सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिल्याने ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.